Joshua 3

1यहोशवा पहाटेस ऊठला आणि सर्व इस्राएल लोकांसह शिट्टीमाहून निघून यार्देनतीरी आला आणि पलीकडे जाण्यापूर्वी ते तेथे राहीले.

2तीन दिवसानंतर पुढारी छावणीच्या मध्यभागामधून गेले 3व त्यांनी लोकांना अशी आज्ञा केली की, आमचा देव परमेश्वर याच्या कराराचा कोश लेवीय याजक ऊचलून नेत असताना तुम्ही पाहाल तेव्हा हे ठिकाण सोडून त्यांच्या पाठोपाठ जा; 4पण कोशाच्या व तुमच्यामध्ये मोजून सुमारे दोन हजार हात अंतर ठेवा; त्याच्या फार जवळ जाऊ नका, म्हणजे ज्या वाटेने तुम्हाला जायचे आहे ती तुम्हाला समजेल; कारण यापूर्वी या वाटेने तुम्ही कधी गेला नाही.

5मग यहोशवा लोकांना म्हणाला, शुध्द व्हा, कारण उद्या परमेश्वर तुमच्यामध्ये आश्चर्यकारक कृत्ये करणार आहे. 6नंतर यहोशवा याजकांना म्हणाला, कराराचा कोश उचलून घेऊन लोकांच्या पुढे चला, त्याप्रमाणे ते कराराचा कोश उचलून घेऊन लोकांच्या पुढे चालू लागले.

7परमेश्वर यहोशवाला म्हणाला, आज मी सर्व इस्राएलाच्या नजरेसमोर तुझी थोरवी वाढविण्यास सुरवात करीन, म्हणजे मी जसा मोशेबरोबर होतो तसाच तुझ्याबरोबरही आहे हे त्यांना समजून येईल. 8कराराचा कोश वाहणाऱ्या याजकांना आज्ञा कर की, जेव्हा तुम्ही यार्देनेच्या पाण्याच्या कडेला पोहचाल तेव्हा यार्देन नदीत स्थिर उभे राहा.

9मग यहोशवा इस्राएल लोकांना म्हणाला, जवळ येऊन तुमचा देव परमेश्वर याची वचने ऐका, 10यहोशवा म्हणाला, जिवंत देव तुमच्यामध्ये आहे आणि कनानी, हित्ती, हिव्वी, परिज्जी, गिर्गाशी, अमोरी व यबूसी यांना तो तुमच्यासमोरून खरोखरच वतनातून घालवून देईल हे याप्रमाणे तुम्हाला कळून येईल. 11संपुर्ण पृथ्वीचा जो प्रभू त्याच्या कराराचा कोश तुमच्यासमोर पलीकडे जाण्यासाठी यार्देनेत प्रवेश करीत आहे.

12तर आता प्रत्येक वंशातील एक माणूस, अशी इस्राएल वंशातून बारा माणसे तुम्ही निवडा; 13संपूर्ण पृथ्वीचा जो प्रभू परमेश्वर याच्या कराराचा कोश वाहणाऱ्या याजकांचे पायांचे तळवे यार्देनेच्या पाण्याला लागताच वरून वाहत येणारे यार्देनेचे पाणी वाहण्याचे थांबून त्याचे दोन भाग होतील व त्याची रास उभी राहील.

14लोक यार्देनेपलीकडे जाण्यासाठी आपल्या तंबुतून निघाले तेव्हा कराराचा कोश वाहणारे याजक लोकांपुढे चालले. 15कराराचा कोश वाहणारे यार्देनेपाशी येऊन पोहचले आणि कोश वाहणाऱ्या याजकांचे पाय कडेच्या पाण्यात बुडाले. कापणीच्या हंगामाच्या दिवसात यार्देन नदी दुथडी भरून वाहत असते. 16तेव्हा जे पाणी वरून वाहत येत होते ते बऱ्याच अंतरावर म्हणजे सारतानाजवळील आदाम नगरापाशी साठून राहिले व त्याची रास उभी झाली, आणि जे पाणी अराबाचा समुद्र म्हणजे क्षारसमुद्र याकडे वाहत जात होते ते अगदी हटले; मग ते सर्व लोक यरीहोसमोर पार उतरून गेले.

परमेश्वराच्या कराराचा कोश वाहणारे याजक यार्देनेच्या मध्यभागी कोरड्या जमिनीवरून पार निघून गेले. अशाप्रकारे सर्व इस्राएल राष्ट्र यार्देनेपलीकडे गेले.

17

Copyright information for MarULB