‏ Psalms 122

प्रवाशांचे आराधना गीत. दावीदाची रचना.

1मी हर्षित झालो, जेव्हा ते मला म्हणाले,
“चला आपण याहवेहच्या मंदिरात जाऊ.”
2अगे यरुशलेमे, आम्ही आता आपले पाऊल
तुझ्या वेशीच्या आत ठेवले आहे.

3यरुशलेम नगरी अशी बांधलेली आहे,
जशी एखादी सुसंबद्धपणे रचलेली नगरी.
4हेच ते स्थान आहे जिथे इस्राएलास दिलेल्या नियमाप्रमाणे सर्व कुळे—
याहवेहची कुळे—
याहवेहची उपकारस्तुती करण्यास
येथे जमत आहेत.
5इथेच न्याय-सिंहासन, दावीदाच्या वंशाचे
सिंहासन स्थापित केले आहे.

6यरुशलेमवरील शांतीसाठी प्रार्थना करा की
या नगरीवर प्रीती करणार्‍या सर्वांची सुरक्षा होवो.
7तुझ्या तटांच्या आत शांती नांदो;
तुझ्या राजवाड्यामध्ये सुरक्षितता राहो.
8जे माझे कुटुंब व माझे स्नेही येथे राहतात, त्यांच्यासाठी मी मागतो,
“तुझ्यामध्ये शांती नांदो.”
9आपले परमेश्वर याहवेह, यांच्या मंदिराप्रीत्यर्थ,
तुझा उत्कर्ष व्हावा, अशी अभिलाषा करेन.
Copyright information for MarMRCV