‏ Psalms 20

संगीत दिग्दर्शकासाठी. दावीदाचे स्तोत्र.

1संकटाच्या समयी याहवेह तुझे ऐको;
याकोबाच्या परमेश्वराचे नाम सर्व अरिष्टांपासून तुझे रक्षण करो.
2त्यांच्या पवित्रस्थानातून ते तुला मदत पाठवो
आणि ते तुला सीयोनातून साहाय्य पाठवो.
3तू दिलेल्या सर्व अर्पणांचे त्यांना स्मरण होवो
आणि तुझी होमार्पणे ते स्वीकारोत. सेला
सेला या इब्री शब्दाचा अर्थ कदाचित गीत गाताना मध्ये थोडे थांबणे असा आहे

4तुझ्या हृदयातील मनोरथ ते पूर्ण करो
आणि तुझ्या सर्व योजना ते सिद्धीस नेवोत.
5तुझ्या विजयात आम्ही आनंदाने गर्जना करू
आणि आपल्या परमेश्वराच्या नावाने आपला झेंडा उंचावू.

याहवेह तुझे सर्व मनोरथ पूर्ण करोत.

6आता मला माहीत आहे:
याहवेह आपल्या अभिषिक्तास विजय प्रदान करतात;
पवित्र स्वर्गातून त्यांच्या तारणदात्या
उजव्या हाताच्या सामर्थ्याने त्याला उत्तर देतात.
7कोणी रथांवर आणि कोणी घोड्यांवर भरवसा ठेवतात,
परंतु आम्ही याहवेह आमच्या परमेश्वराच्या नावावर भरवसा ठेऊ.
8ती कोसळतील आणि नाश पावतील,
पण आम्ही उठू आणि बळकटपणे उभे राहू.
9याहवेह, राजाला विजयी करा!
जेव्हा आम्ही हाक मारू, तेव्हा आमचे ऐका!
Copyright information for MarMRCV