‏ Psalms 43

1परमेश्वर, मला निर्दोष ठरवा
आणि भक्तिहीन पिढीविरुद्ध
माझ्या बाजूने निकाल द्या.
या दुष्ट आणि कपटी लोकांपासून
माझा बचाव करा.
2कारण परमेश्वर तुम्हीच माझे बळकट दुर्ग आहात;
तुम्ही माझा त्याग का केला?
शत्रूंद्वारे होणार्‍या छळामुळे
मी का दुःखी व्हावे?
3तुमचा प्रकाश आणि तुमचे सत्य मला लाभोत;
तीच मला मार्ग दाखवोत;
तुमच्या पवित्र पर्वतावरील, तुमच्या निवासमंडपात,
तीच मला घेऊन जावोत.
4तेव्हा मी परमेश्वराच्या वेदीजवळ जाईन,
तेच परमेश्वर जे माझे परमानंद आहेत;
आणि तिथे हे परमेश्वरा, माझ्या परमेश्वरा,
वीणेवर मी तुमची स्तुतिस्तोत्रे गाईन.

5हे माझ्या जिवा, तू खिन्न का झालास?
आतल्याआत का तळमळत आहेस?
परमेश्वरावर आपली आशा ठेव,
मी पुनः माझा तारणारा आणि
माझ्या परमेश्वराची स्तुती करेन.
Copyright information for MarMRCV