Psalms 63
यहूदीयाच्या रानात असताना रचलेले दावीदाचे स्तोत्र.
1हे परमेश्वरा, तुम्ही माझे परमेश्वर आहात,मी तुमचा कळकळीने शोध करतो;
या कोरड्या आणि वैराण भूमीत
माझा जीव तुमच्यासाठी तहानलेला झाला आहे;
माझे सर्वस्व तुमच्यासाठी किती
उत्कंठित झाले आहे.
2तुमचे सामर्थ्य आणि गौरव
मी तुमच्या पवित्रस्थानी पाहिले आहे.
3कारण तुमची प्रीती जीवनाहून उत्तम आहे,
माझे ओठ तुमचे गौरव करतील.
4माझ्या जिवात जीव आहे तोपर्यंत मी तुम्हाला धन्यवाद देईन
आणि माझे हात तुमच्या नावाने उंच करेन.
5उत्कृष्ट भोजनाने व्हावे तसा मी तृप्त होईल;
गीत गाणार्या ओठांनी मी तुमची स्तुती करेन.
6माझ्या बिछान्यावर मी तुमचे स्मरण करतो;
रात्रीच्या प्रत्येक प्रहरी मी तुमचे मनन करतो.
7कारण तुम्ही माझे साहाय्य आहात,
तुमच्या पंखांच्या सावलीत मी गीत गातो.
8मी तुम्हाला बिलगून राहतो;
तुमचा उजवा हात मला सावरून धरतो.
9जे मला मारू इच्छितात त्यांचा नाश होईल;
ते पृथ्वीच्या खोल रसातळी जातील.
10तलवारीच्या धारेने ते पडतील;
कोल्ह्यांचे ते भक्ष्य होतील.
11परंतु राजा परमेश्वरामध्ये उल्हास करेल;
जे लोक परमेश्वराची शपथ घेतात, ते सर्व त्याचे गौरव होईल;
परंतु लबाडांची तोंडे बंद होतील.
Copyright information for
MarMRCV