‏ Psalms 99

1याहवेह राज्य करतात,
राष्ट्रे थरथर कापोत;
ते करुबांमध्ये सिंहासनावर आरूढ झाले आहेत;
सर्व पृथ्वी कंपित होवो.
2अतिमहान होत सीयोनातील याहवेह;
ते सर्व राष्ट्रात परमोच्च असे आहेत.
3राष्ट्रे तुमच्या थोर व भयावह नामाची स्तुती करोत—
याहवेह पवित्र आहेत.

4राजा सामर्थ्यशाली आहेत, त्यांना न्याय प्रिय आहे—
तुम्ही याकोबात
निष्पक्षपात प्रस्थापित केला;
जो न्यायसंगत व रास्त आहे.
5आपले परमेश्वर याहवेहची थोरवी गा,
व त्यांच्या चरणी आराधना करा;
याहवेह पवित्र आहेत.

6मोशे आणि अहरोन त्यांचे याजक होते,
व शमुवेल त्यांचा उपासक, त्यांचा धावा करणार्‍यांपैकी होते;
यांनी याहवेहचा धावा केला,
आणि त्यांनी त्यांना उत्तर दिले.
7ते त्यांच्याशी मेघस्तंभातून बोलले;
त्यांच्याकडे सोपविलेल्या अधिनियमांचे व आदेशांचे त्या लोकांनी पालन केले.

8याहवेह, आमच्या परमेश्वरा,
तुम्ही त्यांना उत्तर दिले;
त्यांच्या दुष्कृत्यांची त्यांना शिक्षा केली,
तरी इस्राएलसाठी तुम्ही क्षमाशील परमेश्वर होता.
9आपल्या परमेश्वराची थोरवी गा,
आणि त्यांच्या पवित्र पर्वतावर उपासना करा,
कारण आपले परमेश्वर याहवेह पवित्र आहेत.
Copyright information for MarMRCV