‏ Psalms 121

प्रवाशांचे आराधना गीत.

1मी आपली दृष्टी पर्वताकडे लावतो—
मला साहाय्य कुठून येईल?
2स्वर्ग व पृथ्वीचे निर्माणकर्ते याहवेह,
तेच माझ्या साहाय्यतेचा उगम आहेत.

3ते तुझा पाय कदापि घसरू देणार नाहीत;
तुझे रक्षक डुलकीही घेत नाही.
4खरोखर जे इस्राएलचे रक्षक आहेत ते झोपी जात नाहीत
किंवा डुलकीही घेत नाहीत.

5याहवेह स्वतः तुझे रक्षण करतात—
याहवेह तुझ्या उजव्या हाताजवळ सावलीसारखे आहेत.
6दिवसाच्या सूर्याची तुला बाधा होणार नाही,
आणि रात्रीच्या चंद्राची देखील नाही.

7याहवेह सर्व अनिष्टांपासून तुला सुरक्षित ठेवतील—
आणि तुझ्या जिवाचे रक्षण करतील.
8तुझे आता आणि सर्वकाळ येणे व जाणे,
यावर याहवेह बारकाईने लक्ष ठेवतील.
Copyright information for MarMRCV