‏ Psalms 129

प्रवाशांचे आराधना गीत.

1“माझ्या किशोरावस्थेपासून त्यांनी माझ्यावर घोर अत्याचार केला आहे,”
इस्राएल म्हणो;
2“माझ्या किशोरावस्थेपासून माझ्यावर घोर अत्याचार करण्यात आला आहे,
तरीही त्यांना माझ्यावर विजय मिळविता आला नाही.
3शेतकर्‍याने नांगरल्याप्रमाणे
त्यांनी माझ्या पाठीवर लांब लांब तासे काढली.
4परंतु याहवेह न्यायी आहेत;
त्यांनी मला त्या दुष्टांच्या बंधनातून मुक्त केले.”

5सीयोनाचा द्वेष करणारे सर्व
लाजिरवाणा पराजय होऊन परत जावोत.
6घरांच्या छपरावर उगविलेल्या गवतासारखे ते होवोत,
जे अर्धवट वाढल्याबरोबर सुकून पिवळे पडते;
7कापणार्‍यांच्या हातात काहीही पडत नाही,
की बांधणार्‍यांनाही पेंढ्या मिळत नाहीत.
8येणारे जाणारे लोक त्यांना असे न म्हणोत,
“याहवेहचे आशीर्वाद तुम्हावर येवोत;
आम्ही तुम्हाला याहवेहच्या नावाने आशीर्वाद देतो.”
Copyright information for MarMRCV