‏ Psalms 29

दावीदाचे स्तोत्र.

1अहो दिव्यदूतांनो,
याहवेहला गौरव आणि सामर्थ्य द्या.
2याहवेहच्या नावाला योग्य ते गौरव द्या;
पवित्रतेच्या वैभवाने याहवेहची उपासना करा.

3याहवेहची वाणी जलांवर आहे;
गौरवशाली याहवेहची वाणी
महा जलाशयांवर गर्जत आहे.
4याहवेहची वाणी प्रतापशाली आहे;
प्रभावी आहे याहवेहचा स्वर.
5याहवेहच्या गर्जनेने देवदारू वृक्ष मोडून पडतात;
लबानोनमधील देवदारू वृक्ष दुभंगतात.
6लबानोनचा डोंगर वासराप्रमाणे
आणि सिर्योन
अर्थात् हर्मोन पर्वत
तरुण रानबैलाप्रमाणे बागडतो;
7याहवेहचा आवाज कडाडतो,
विजा चमकल्यासारखा.
8याहवेहच्या आवाजाचा गडगडाट वाळवंटे ढवळून काढतात;
कादेशचे अरण्य याहवेह कंपित करतात.
9याहवेहच्या आवाजाने हरिणी प्रसवतात
किंवा एला वृक्ष वाकवितात

आणि वने पर्णहीन होतात.
आणि त्यांच्या मंदिरात सर्वजण म्हणतात: “याहवेहचा, महिमा असो.”

10याहवेह जलप्रलयावर सिंहासनावर आरूढ झालेले आहेत;
याहवेहच महाराज बनून सिंहासनावर सर्वकाळ स्थानबद्ध झालेले आहेत.
11याहवेह आपल्या लोकांना सामर्थ्य देतात;
याहवेह आपल्या लोकांना शांती देऊन आशीर्वादित करतात.
Copyright information for MarMRCV