‏ Psalms 62

संगीत दिग्दर्शकासाठी. यदूथूनाच्या चालीवर आधारित. दावीदाचे स्तोत्र.

1परमेश्वरामध्ये निश्चितच माझ्या जिवास विश्रांती आहे;
माझे तारण त्यांच्याकडून येते.
2फक्त तेच माझे खडक आणि माझे तारण;
तेच माझा दुर्ग आहेत, माझे ढळणे अशक्य आहे.

3तुम्ही सर्वजण या एका मनुष्याला खाली पाडावयास,
कुठपर्यंत माझ्यावर प्रहार करीत राहणार?
मी तर एका वाकलेल्या भिंतीसारखा, कोसळलेल्या कुंपणासारखा आहे.
4मला उच्च स्थानावरून खाली
पाडण्याचा त्यांचा बेत आहे;
त्यांना खोटे बोलणे आवडते;
ते आपल्या तोंडाने आशीर्वाद देतात,
परंतु मनातून शाप देतात. सेला

5तरीही माझा आत्मा परमेश्वरामध्ये शांती पावेल;
माझी आशा त्यांच्यापासून आहे.
6खरोखर तेच माझे खडक, तेच माझे तारण,
तेच माझे दुर्ग आहेत; मी ढळणार नाही.
7माझे तारण आणि माझा सन्मान परमेश्वरावर अवलंबून
किंवा परमेश्वरच आहे
आहे;
तेच माझे भक्कम खडक, माझे आश्रय आहेत.
8माझ्या लोकांनो, तुम्ही सर्वकाळ त्यांच्यावर भरवसा ठेवा;
आपले हृदय त्यांच्यापुढेच मोकळे करा,
कारण परमेश्वरच आमचे आश्रयस्थान आहेत. सेला

9साधारण मानव श्वासमात्र आहेत;
विशिष्ट मानव फक्त मिथ्या आहेत;
तराजूत वजन केले की ते हलकेच भरतील;
ते सर्व श्वासमात्र आहेत.
10पिळवणूकीच्या धनावर विश्वास ठेवू नका
किंवा चोरी केलेल्या वस्तूंवर व्यर्थ आशा ठेवू नका;
जरी तुमची संपत्ती वाढत असेल,
तरी तिच्यावर मन लावू नका.

11परमेश्वर एकदा बोलले आहेत,
मी दोनदा हे ऐकले आहे:
“सामर्थ्य याहवेहचेच आहे,
12आणि प्रभू, तुमच्यामध्ये प्रेमदया सदैव असते;”
आणि, “तुम्ही प्रत्येकाला त्याच्या
कृत्यानुसार प्रतिफळ देता.”
Copyright information for MarMRCV