Psalms 70
संगीत दिग्दर्शकासाठी. दावीदाची रचना. एक याचिका.
1हे परमेश्वरा, त्वरा करून मला वाचवा;याहवेह, मला साहाय्य करण्यासाठी त्वरेने या.
2माझा जीव घेऊ पाहणार्यांना
लज्जित करा व गोंधळात पाडा;
जे सर्वजण माझे विघ्नसंतोषी आहेत
ते अप्रतिष्ठित होऊन माघारी फिरोत.
3जे लोक मला, “अहाहा! अहाहा!” म्हणतात,
ते लज्जित होऊन माघारी फिरोत.
4परंतु जे सर्व तुमचा शोध घेतात
ते तुमच्यामध्ये आनंद आणि हर्ष करोत;
जे तुमच्या तारणाच्या साहाय्याची अपेक्षा बाळगतात
ते सर्व नेहमी हेच म्हणोत, “परमेश्वर किती महान आहेत!”
5परंतु मी तर गरीब आणि गरजवंत आहे;
हे परमेश्वरा, माझ्याकडे त्वरेने या.
तुम्ही माझे साहाय्यकर्ता आणि मला सोडविणारे आहात;
याहवेह, विलंब करू नका.
Copyright information for
MarMRCV