‏ Psalms 83

एक गीत. आसाफाचे एक स्तोत्र.

1हे परमेश्वरा, तुम्ही मौन धरू नका;
आमच्यासाठी कान बहिरे करू नका,
असे अलिप्त राहू नका.
2पाहा तुमचे शत्रू कसे गुरगुरतात,
तुमच्या विरोधकांनी आपले डोके वर काढले आहे.
3तुमच्या लोकांविरुद्ध ते कट करतात;
तुमच्या प्रिय लोकांविरुद्ध ते कारस्थान करीत आहेत.
4ते म्हणतात, “चला, आपण इस्राएली राष्ट्रांचा समूळ नाश करू या;
त्यांच्या अस्तित्वाची आठवण देखील आपण नष्ट करून टाकू.”

5एकजूट होऊन एकमताने त्यांनी कट रचला;
ते सर्व तुमच्याविरुद्ध संघटित झाले आहेत—
6एदोमी तथा इश्माएली,
मोआबी आणि हगरी लोकांचे डेरे,
7गबाल, अम्मोन, व अमालेक,
पलेशेथ आणि सोरचे निवासी.
8अश्शूरही देखील त्यांना सामील झाला आहे
की त्याने लोटाच्या वंशजांना सशक्त करावे. सेला

9पूर्वी जसा तुम्ही मिद्यानाशी,
किंवा सिसेरा व किशोन नदीजवळ याबीनांशी व्यवहार केला, तसाच यांच्याशीही करा.
10ज्यांचा विनाश एनदोर येथे झाला,
आणि मग ते भूमीवर पडलेल्या शेणासारखे झाले.
11त्यांच्या सरदारांना ओरेब व जेब समान होऊ द्या;
त्यांच्या अधिपतींना जेबह व सलमुन्ना सारखेच होऊ द्या.
12ते म्हणाले होते,
“चला परमेश्वराची कुरणे आपण हस्तगत करू या.”

13हे माझ्या परमेश्वरा, वावटळीच्या धुळीगत,
वार्‍याने उडणार्‍या भुशागत त्यांना करा.
14अग्नी वनाला भस्म करतो,
ज्वाला डोंगराला आग लावते,
15आपल्या वादळाने त्यांचा पाठलाग करा,
व आपल्या तुफानाने त्यांना घाबरवून सोडा.
16हे याहवेह, तुम्ही त्यांना पूर्णपणे लज्जित करा,
जेणेकरून त्यांनी तुमच्या नावाचा शोध करावा.

17ते कायमचे फजीत होवोत आणि गोंधळून जावोत;
त्यांचा लज्जास्पद नाश होऊ द्या.
18त्यांना समजू द्या की, ज्यांचे नाव याहवेह आहे—
तेच या समस्त पृथ्वीचे एकमेव परमश्रेष्ठ स्वामी आहेत.
Copyright information for MarMRCV