‏ Psalms 84

संगीत निर्देशकाकरिता. गित्तीथ
शीर्षक: बहुतेक संगीत संबंधित एक शब्द
वर आधारित. कोरहाच्या पुत्रांची रचना. एक स्तोत्र.

1हे सर्वशक्तिमान याहवेह,
तुमचे निवासस्थान किती रम्य आहे!
2याहवेह तुमच्या अंगणाच्या उत्कंठेने मी,
मूर्छित होईपर्यंत आतुर झालो आहे;
माझा जीव व माझा देह
जिवंत परमेश्वराला आरोळी मारीत आहे.
3हे सर्वशक्तिमान याहवेह, माझ्या राजा आणि माझ्या देवा,
तुमच्या वेद्यांजवळ
चिमणीला घरटी बांधण्याचे,
व निळवीला देखील आपली पिल्ले ठेवण्याचे
ठिकाण सापडले आहे.
4जे तुमच्या मंदिरात राहू शकतात, ते किती धन्य आहेत;
ते निरंतर तुमचे स्तवन करतात. सेला

5ज्या मनुष्याच्या सामर्थ्याचा उगम तुम्हीच आहात, ते किती धन्य आहेत,
ज्यांचे अंतःकरण तुमच्या मार्गाचे यात्रेकरू आहेत.
6ते बाका दरीतून
बाका दरी अर्थात् रडण्याची दरी
जात असताना,
ती त्यांना झर्‍यांचे स्थान होईल;
शरदॠतूतील पाऊसही तिला आशीर्वादाने झाकून टाकील.
7सीयोनात परमेश्वराच्या समोर प्रत्येकजण उपस्थित होईपर्यंत,
त्यांचे सामर्थ्य दिवसेंदिवस वाढेल.

8याहवेह, सर्वशक्तिमान परमेश्वरा, माझी प्रार्थना ऐका;
याकोबाच्या परमेश्वरा, माझे ऐका. सेला
9हे परमेश्वरा, तुम्ही आमच्या ढालीवर दृष्टी टाका;
आपल्या अभिषिक्तावर कृपादृष्टी करा.

10तुमच्या अंगणात घालविलेला एक दिवस,
इतर कुठेही घालविलेल्या सहस्र दिवसांपेक्षा उत्तम आहे;
दुष्टाईच्या मंडपात राहण्यापेक्षा,
माझ्या परमेश्वराच्या भवनाचा द्वारपाल होऊन राहण्यात मला अधिक आनंद आहे.
11कारण याहवेह परमेश्वर आमचा सूर्य आणि आमची ढाल आहेत;
ते आम्हाला कृपा व गौरव देतात;
जे निष्कलंक असतात,
त्यांच्यापासून ते कोणतीही उत्तम गोष्ट रोखून धरणार नाहीत.

12सर्वशक्तिमान याहवेह, जे लोक तुमच्यावर भाव ठेवतात,
ते कितीतरी धन्य होत.
Copyright information for MarMRCV