Exodus 12:1-17
वल्हांडण व बेखमीर भाकरीचा सण
1मग इजिप्तमध्ये याहवेह मोशे व अहरोन यांच्याशी बोलले, 2“हा महिना तुमच्यासाठी पहिला महिना, वर्षाचा पहिला महिना असेल. 3तू इस्राएलाच्या सर्व समुदायाला जाहीर कर की, या महिन्याच्या दहाव्या दिवशी, प्रत्येकाने आपल्या कुटुंबासाठी एक कोकरू घ्यावे, प्रत्येक घराण्यासाठी एक कोकरू. 4जर एखादे कुटुंब एका कोकराच्या मानाने लहान असले तर शेजारच्या कुटुंबाबरोबर, त्यांच्यातील लोकांची संख्या लक्षात घेऊन प्रत्येक व्यक्ती किती खाईल यानुसार अंदाज घेऊन, किती कोकरे लागतील हे ठरवावे. 5एक वर्षाचे निर्दोष नर कोकरू असावे, आणि तुम्ही ते मेंढरांतून अथवा शेळ्यांतून घ्यावे. 6या महिन्याच्या चौदाव्या दिवसापर्यंत त्यांची काळजी घ्यावी आणि इस्राएली लोकातील सर्वांनी सायंकाळी ते कापावेत. 7ज्या घरांमध्ये ते खातील त्या घराच्या दोन्ही दारपट्ट्यांना व कपाळपट्टीला त्या कोकराचे रक्त घेऊन ते लावावे. 8त्या रात्री प्रत्येकाने त्या कोकर्याचे विस्तवावर भाजलेले मांस, बेखमीर भाकर व कडू भाजी यांच्याबरोबर खावे. 9मांस कच्चे किंवा पाण्यात उकळून खाऊ नये, तर विस्तवावर भाजून, त्याचे डोके, पाय व आतड्यांसह खावे. 10त्यातील काहीही सकाळपर्यंत राहू देऊ नये; जर काही सकाळपर्यंत उरले तर ते जाळून टाकावे. 11तुम्ही ते असे खावे: तुमच्या कंबरा बांधलेल्या, तुमची पायतणे पायात घातलेली व हातात काठी घेऊन ते घाईघाईने खावे. हा याहवेहचा वल्हांडण ▼▼मूळ भाषेत पेसाह-ओलांडणे
आहे. 12“कारण त्याच रात्री मी संपूर्ण इजिप्त देशामधून संचार करेन व सर्व मनुष्यांचे व जनावरांचे प्रथमवत्स मारून टाकेन आणि त्यांच्या सर्व दैवतांवर न्याय आणेन; मी याहवेह आहे. 13तुम्ही राहत असलेल्या घरांच्या दारांवर असलेले रक्त हे तुमच्याकरिता चिन्ह असेल, जेव्हा मी ते रक्त पाहीन, तेव्हा मी तुम्हाला ओलांडून पुढे जाईन. जेव्हा मी इजिप्तला तडाखा देईन, तेव्हा कोणतीही विनाशी पीडा तुम्हाला स्पर्श करणार नाही. 14“हा दिवस तुम्ही याहवेहचा सण म्हणून पिढ्यान् पिढ्यांपर्यंत सर्वकाळच्या नियमाने पाळावा. 15सात दिवस तुम्ही खमीर नसलेली भाकर खावी. पहिल्या दिवशी आपल्या घरातून खमीर काढून टाकावे, कारण जे कोणी या सात दिवसात खमीर घातलेल्या वस्तू खाईल, त्याला इस्राएलातून बेदखल करण्यात यावे. 16पहिल्या दिवशी एक पवित्र सभा भरवावी आणि सातव्या दिवशी दुसरी सभा. या दिवसात प्रत्येकाने खाण्यासाठी अन्न तयार करण्याशिवाय इतर कोणतेही काम करू नये. 17“बेखमीर भाकरीचा सण पाळावा, कारण याच दिवशी मी तुमच्या सैन्यांना इजिप्तमधून बाहेर आणले. पिढ्यान् पिढ्यांपर्यंत सर्वकाळच्या नियमाने तो पाळावा.
Copyright information for
MarMRCV