Exodus 19:16-25
16तिसर्या दिवसाच्या सकाळी ढगांचा गडगडाट होऊन विजा चमकू लागल्या व पर्वतावर दाट ढग जमा झाले आणि तुतारीचा फार मोठा नाद झाला. छावणीतील सर्वजण भीतीने कापू लागले. 17मग मोशेने लोकांना परमेश्वराला भेटण्यासाठी छावणीच्या बाहेर आणले आणि ते पर्वताच्या पायथ्याशी उभे राहिले. 18सीनाय पर्वत धुराने झाकून गेला होता, कारण याहवेह अग्निरुपात पर्वतावर उतरले होते. भट्टीतून निघावा तसा धूर उठला होता आणि सगळा पर्वत जोरात थरथरत होता. 19कर्ण्याचा आवाज जसा मोठा होत गेला, तसा मोशे बोलत होता आणि परमेश्वर त्याला उत्तर देत होते. 20याहवेह सीनाय पर्वतावर उतरले व मोशेला पर्वतावर बोलाविले. मग मोशे वर गेला, 21आणि याहवेह मोशेला म्हणाले. “खाली जा व लोकांना सांग की याहवेहला पाहण्यासाठी त्यांनी सीमा ओलांडू नये आणि पुष्कळांचा नाश होऊ नये. 22याहवेहची सेवा करावयास जे याजक जवळ येतात त्यांनी सुद्धा स्वतःला पवित्र करावे, नाहीतर याहवेह त्यांच्याविरुद्ध भडकतील.” 23तेव्हा मोशे याहवेहला म्हणाला, “लोक सीनाय पर्वताजवळ येऊ शकत नाहीत, कारण तुम्ही स्वतःच आम्हाला ताकीद दिली आहे, ‘पर्वताभोवती सीमा आखून आम्ही त्याला पवित्र ठेवावे.’ ” 24याहवेहने उत्तर दिले, “खाली जा आणि अहरोनाला तुझ्याबरोबर घेऊन ये. परंतु याजकांनी व लोकांनी याहवेहकडे सीमा ओलांडून येऊ नये, नाहीतर याहवेह त्यांच्याविरुद्ध भडकतील.” 25मग मोशे खाली लोकांकडे गेला व त्यांना हे सर्व सांगितले.
Copyright information for
MarMRCV